कणकवली : गोव्याहून राजस्थानच्या दिशेने अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली सुमारे ४८ लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि २० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो कणकवली पोलिसांनी जप्त केला. खारेपाटण चेकपोस्टवर १९ जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम आणि कॉन्स्टेबल उद्देश कदम यांनी सतर्कता दाखवत ही दमदार कामगिरी केली. पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई फत्ते करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजस्थान येथील अर्जीराम गोदारा आणि मुकेश खिमाराम पंडित या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान १८० मिलीच्या ४८ हजार दारूच्या बाटल्या, ज्यांची अंदाजे किंमत ४८ लाख रुपये आहे, तसेच २० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त केला. पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.











