तब्बल ८.६७ कोटींचा निधी : आमदार केसरकरांनी मानले खा. नारायण राणे यांचे आभार
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग ३’ अंतर्गत मतदारसंघातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील तीन प्रमुख पुलांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या तीन पुलांसाठी एकूण ८ कोटी ६७ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे पावसाळ्यात निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि संपर्क तुटण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे.
सावंतवाडीचे लोकप्रिय आमदार दीपकभाई केसरकर यांच्या सातत्यपूर्ण मागणीनुसार आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायणराव राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून केंद्र सरकारने या कामांना हिरवा कंदील दाखवला आहे.
या अंतर्गत मंजूर झालेल्या कामांमध्ये दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील तीन महत्त्वाच्या पुलांचा समावेश आहे. यामध्ये पडवे कोलझर कुंभवडे पणतुर्ली रस्त्यावरील (साखळी क्र. २/५५०) २२ मीटर लांबीच्या पुलाच्या कामासाठी २ कोटी ७८.०५ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. तसेच भेडशी खानयाळे शिरंगे पुनर्वसन रस्त्यावरील ४० मीटर लांबीच्या पुलाच्या कामासाठी ३ कोटी ४७.५८ लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यासोबतच सावंतवाडी तालुक्यातील बांदा मच्छिमार्केट बांदेश्वर मंदिर ते सटमट डिंगणे रस्त्यावरील (साखळी क्र. १/४७०) २४.०५ मीटर लांबीच्या पुलासाठी २ कोटी ४१.७७ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या तीनही ग्रामीण रस्त्यांवरील पुलांच्या निर्मितीमुळे परिसरातील गावांचा मुख्य शहरांशी असणारा संपर्क अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात या भागात निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या आणि रहदारीच्या गंभीर समस्यांवर या कामांमुळे कायमस्वरूपी तोडगा निघणार असल्याने स्थानिक जनतेतून मोठे समाधान व्यक्त होत आहे.
मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेसाठी अत्यंत आवश्यक असणारी ही तीन पुले मंजूर केल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान आणि खासदार नारायणराव राणे यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले आहेत.













