तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट व पाहणीची माजी विद्यार्थ्याची मागणी.!
कणकवली : कणकवली येथील एस. एम. हायस्कूलची मुख्य इमारत अत्यंत जीर्ण व मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शाळेचे माजी विद्यार्थी संदीप चंद्रकांत मेस्त्री यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत इमारतीची तातडीने पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात मेस्त्री यांनी म्हटले आहे की, एस. एम. हायस्कूलमध्ये दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, शाळेची मुख्य इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. इमारतीची सध्याची दुरवस्था पाहून एक माजी विद्यार्थी म्हणून दुःख होत असून हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, इमारतीच्या स्थितीबाबत शाळा प्रशासन व संस्थाचालकांना माहिती असूनही आवश्यक दुरुस्ती किंवा सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली दिसत नाही. सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू असल्याने जीर्ण इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संदीप मेस्त्री यांनी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी यांनी स्वतः अथवा संबंधित पथकाद्वारे शाळेच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करावी, स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे तसेच यापूर्वी ऑडिट झाले असल्यास त्याचा अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळा प्रशासनाला तात्काळ आवश्यक सूचना व कडक आदेश देऊन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शालेय मुलांच्या जीविताचा प्रश्न असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षाही मेस्त्री यांनी व्यक्त केली आहे.












