ड्रोनच्या सहाय्याने लागला शोध; आज पुन्हा प्रयत्न होणार
दोडामार्ग: सुहास देसाई
येथील प्रसिद्ध विर्डी वझर सखल धबधब्यात गुरुवारी दुपारी बुडालेल्या कर्नाटकातील धारवाड येथील विजय दोडमणी (वय २३) या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी शोधमोहिमे दरम्यान शोधण्यात यश आले. मात्र, मृतदेह सुमारे सात मीटर खोल पाण्यात आणि थेट धबधब्याच्या प्रचंड प्रवाहाखाली अडकल्याने त्याला बाहेर काढणे बचाव पथकाला शक्य झाले नाही. अखेर परिस्थिती प्रतिकूल असल्याने सायंकाळी शोधमोहीम स्थगित करण्यात आली असून, आज (शनिवारी) पुन्हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
विजय दोडमणी हा गुरुवारी दुपारी आपल्या मित्रांसह विर्डी येथील वझर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आला होता. जलकुंडात पोहत असताना अचानक तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी गुरुवारी तातडीने शोधकार्य सुरू केले होते. मात्र, कुंडाची अथांग खोली आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने गुरुवारी त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.
ड्रोनच्या मदतीने लागला माग
शुक्रवारी सकाळी ‘सह्याद्री अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम’चे बाबल आल्मेडा, मायकल डिसोजा, संतान आल्मेडा, दीपक मेस्त्री, नारायण चव्हाण, उत्तम नार्वेकर आणि गुरूनाथ सावंत यांचे पथक अत्याधुनिक उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाले. पथकाने सुरुवातीला ड्रोनच्या मदतीने संपूर्ण जलकुंडाचे बारकाईने निरीक्षण केले. सुमारे तासभर चाललेल्या या तांत्रिक शोधकार्यानंतर पाण्याखाली मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. ड्रोन कॅमेऱ्यात मृतदेह अंदाजे सात मीटर खोलीवर असल्याचे दिसून आले.
धोकादायक परिस्थितीमुळे मोहीम थांबवली
मृतदेहाचे अचूक लोकेशन मिळाले असले, तरी तो ज्या ठिकाणी अडकला होता, त्याच भागावरून धबधब्याचा वेगवान आणि प्रचंड पाण्याचा प्रवाह थेट खाली कोसळत आहे. पाण्याचा अतीव दाब आणि खोल पाणी यामुळे बचाव पथकातील जवानांना मृतदेहापर्यंत सुरक्षित पोहोचणे अत्यंत धोक्याचे बनले होते.
दिवसभरात बचाव पथकाने विविध पर्यायांची चाचपणी करून मृतदेह बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि सतत बदलणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे यश आले नाही. अखेर जवानांच्या सुरक्षेचा विचार करता सायंकाळी उशिरा शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता शनिवारी सकाळी पुन्हा एकदा मृतदेह बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे











