घे भरारी फाउंडेशनच्या वतीने सावंतवाडीत वृक्षारोपण ; पर्यावरण रक्षणाचा घेतला संकल्प

 

सावंतवाडी : पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने येथील ‘घे भरारी फाउंडेशन’च्या वतीने तालुका स्कूल शाळा नं. १ येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत शाळेसमोरील मैदानातील उपलब्ध जागेत विविध प्रकारच्या उपयुक्त देशी रोपांची लागवड करण्यात आली.

वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ या गंभीर समस्यांवर वृक्षारोपण हाच एकमेव आणि प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन घे भरारी फाउंडेशनच्या नूतन अध्यक्षा ज्योती दुधवडकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. तसेच उपस्थित मुलांना वृक्षारोपणाचे व पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात चाफा, चिकू, जांभूळ, जाम, सुपारी, अशोक वृक्ष आणि काजू यांसारख्या विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. लावलेल्या या सर्व रोपांची पुढील काळजी व संगोपन शाळा नं. १ मधील विद्यार्थी, शिक्षक आणि घे भरारी फाउंडेशनचे सर्व सभासद मिळून घेणार आहेत.

या कार्यक्रमाला तालुका स्कूल शाळा नं. १ च्या शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घे भरारी फाउंडेशनच्या वतीने संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्षा ज्योती दुधवडकर, उपाध्यक्षा मेघना राऊळ, कार्याध्यक्षा रिया रेडीज, सेक्रेटरी मेघा डुबळे, खजिनदार मेघना साळगावकर, सल्लागार शारदा गुरव तसेच सदस्य रेखा कुमटेकर, सलोनी वंजारी, वैष्णवी बांदेकर, संध्या पवार, मनीषा नवांगुळ, दीपा नेवगी आणि समीक्षा मडगावकर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या शेवटी घे भरारीच्या प्रत्येक सभासदाने स्वतः एक रोप लावून उपस्थितांना वृक्षारोपणाचा संदेश दिला. केवळ रोपे न लावता ती जिवंत ठेवून जगवण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारली आणि पर्यावरण रक्षणाचा दृढ संकल्प करत कार्यक्रमाची सांगता झाली.