देवरूख न्यायालयाचा निकाल
देवरूख: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी (शाखा- देवरूख) च्या बाजूने एक महत्त्वपूर्ण निकाल देत, येथील न्यायदंडाधिकारी वर्ग १ न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणातील आरोपी मुआज्जम महमद साटविलकर यांना दोषी ठरविले आहे. न्यायालयाने आरोपीला एकूण ३९.५० लाख रुपयांचा दंड आणि साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच, आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास वाढीव कैदेची शिक्षा भोगण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देवरूख शाखेने आरोपी मुआज्जम महमद साटविलकर यांना वाहन कर्ज वितरित केले होते. या कर्जाच्या वसुलीपोटी श्री. साटविलकर यांनी बँकेला एक चेक दिला होता. मात्र, संबंधित बँक खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे तो चेक बाऊन्स झाला. या अनुषंगाने बँकेने देवरूख येथील न्यायदंडाधिकारी वर्ग १ न्यायालयामध्ये ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट’ (Negotiable Instrument Act) च्या कलम १३८ अंतर्गत खटला दाखल केला होता.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान बँकेचे वकील अॅडव्होकेट वाय. जी. चंदगडकर यांनी सादर केलेले कायदेशीर दस्तऐवज आणि युक्तिवाद न्यायालयाने पूर्णपणे ग्राह्य धरले. ‘चेकद्वारे दिलेले आश्वासन पाळणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे ही कायद्याची मुख्य भूमिका आहे,’ असे परखड मत नोंदवत न्यायालयाने आरोपीला ही मोठी शिक्षा सुनावली. विविध बँकांमध्ये प्रलंबित असलेल्या हजारो चेक बाऊन्सच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, थकबाकीदारांनी या निकालाची दखल घेऊन बँकेच्या थकीत कर्जांची वेळेत परतफेड करावी, असा संदेश या निकालातून देण्यात आला आहे.











