खेड (प्रतिनिधी) : खेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नातूनगर धरणातील उपलब्ध जलसाठ्याची पाहणी नगराध्यक्ष सौ. माधवीताई बुटाला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा आणि सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासाठी ही पाहणी करण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्ष श्री. सतीश उर्फ पप्पू चिकणे, नगरसेवक मिनार चिखले, नगरसेवक आरिफ मुलाजी तसेच नगरसेविका संजना ताई कुडाळकर उपस्थित होते. मान्सूनच्या सुरुवातीला अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने पाणीसाठ्याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असताना नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष धरणस्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.
धरणातील शिल्लक जलसाठा, शहराच्या पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती तसेच आगामी काळातील नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी नगरपरिषद प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
खेड शहराच्या वाढत्या पाणी गरजा लक्षात घेऊन उपलब्ध जलसाठ्याचा योग्य वापर आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा करण्यावर भर देण्यात येत असून, पावसाचे प्रमाण वाढेपर्यंत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.











