राजापूर तालुका कुणबी सह. पतपेढीला कोकण विभाग कार्यक्षेत्राची मंजुरी

राजापूर तालुका कुणबी सह. पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांना कोकण विभाग कार्यक्षेत्र मंजरीचे पत्र सुपुर्द करताना सहकार आयुक्त दिपक तावरे.
पतसंस्थेच्या विकासाला मिळणार नवी दिशा

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित, राजापूरच्या प्रगतीच्या वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून पतसंस्थेच्या कोकण विभाग कार्यक्षेत्रास सहकार विभागाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे यांनी या मंजूरीचे पत्र पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी पतसंस्थेचे संचालक रमेश सूद, अनंत मोरवसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर तसेच शाखाधिकारी प्रकाश भाबळे उपस्थित होते.
पतसंस्थेच्या या यशामागे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, संचालक मंडळाचे सहकार्य तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गाचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. सन २०१८ मध्ये भू, कोंडये, नाटे, सागवे आणि आडीवरे या पाच नवीन शाखांना मंजुरी मिळाली. त्यानंतर सन २०२० मध्ये संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आला. सन २०२२ मध्ये पाली, सापुचेतळे, भांबेड आणि साखरपा या चार नवीन शाखांना मंजुरी मिळाली. आता सन २०२६ मध्ये कोकण विभाग कार्यक्षेत्रास मंजुरी मिळाल्याने संस्थेच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
संस्थेने आर्थिक शिस्त आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या बळावर सातत्याने ९९ टक्के कर्जवसुली, शून्य टक्के नेट एनपीए (NPA) आणि आदर्श सीडी रेशो कायम ठेवला आहे. त्यामुळे सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
कोकण विभाग कार्यक्षेत्र मंजुरीमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये संस्थेच्या सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचणार असून सहकार क्षेत्रात संस्थेचे स्थान अधिक बळकट होणार आहे. संस्थेच्या या यशाबद्दल सभासद, ठेवीदार, ग्राहक, अधिकारी, कर्मचारी, पिग्मी व आरडी प्रतिनिधी यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संस्थेच्या या यशाबद्दल अध्यक्ष प्रकाश मांडवकर, उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, अधिकारी, कर्मचारी, पिग्मी व आरडी प्रतिनिधी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. भविष्यातही संस्था अधिक वेगाने प्रगती करत सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.