कणकवलीत आज NEET पुनर्परीक्षा 

परीक्षा केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त

कणकवली : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) पुनर्परीक्षा आज कणकवली येथील परीक्षा केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार आहे. कणकवली कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून दुपारी 2 ते 5 या वेळेत परीक्षा होणार आहे. त्यामुळे सकाळपासूनच विद्यार्थ्यांची लगबग आणि परीक्षा केंद्राकडे धावपळ सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग तसेच पोलीस विभाग सतर्क असून परीक्षा केंद्रांची पाहणीही करण्यात आली आहे.

 

विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी वेळेत केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशपत्र, वैध ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांचीही मोठी गर्दी दिसून येत आहे. मुलांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या परीक्षेमुळे पालकांमध्ये उत्सुकता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

NEET पुनर्परीक्षा कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि पूर्ण पारदर्शकतेने पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.