गोवा बनावटीच्या दारूसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त : तिघांवर गुन्हे दाखल

आंबोली व तळवडेत दोन वेगवेगळ्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त 

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सावंतवाडी पोलिसांची मोठी कारवाई

सावंतवाडी:सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि आंबोली दूरक्षेत्राच्या पोलीस पथकांनी दारू वाहतूक करणाऱ्या दोन वेगवेगळ्या गाड्यांवर धडक कारवाई केली आहे. या दोन्ही कारवायांमध्ये वाहनांसह एकूण १० लाख २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

*तळवडे येथे स्विफ्ट कारमधून दारू जप्त*

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील तळवळे गडगेवाडी – तळी स्टॉप येथे सापळा रचून ही पहिली कारवाई केली. गोव्याकडून येणाऱ्या स्विफ्ट कार (क्रमांक GA 05D 5576) ची झडती घेतली असता, त्यात २८ पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीची विविध ब्रँडची बेकायदेशीर दारू आढळून आली. पोलिसांनी १,७१,२४० रुपये किमतीची दारू आणि ५,००,००० रुपये किमतीची कार, असा एकूण ६,७१,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी आरोपी मेल्व्हिन फर्नांडिस (वय २६, रा. देवसा, जिल्हा उत्तर गोवा) आणि मनवेल फिलिप्स फर्नांडिस (वय ६६, रा. ख्रिश्चन वाडी, सातार्डा) यांच्यावर दारूबंदी व मोटार वाहन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. भोसले, हवालदार कांडर व त्यांच्या पथकाने केली.

 

*आंबोली नाक्यावर टाटा सुमो पकडली*

दुसरी कारवाई आंबोली दूरक्षेत्राच्या पोलीस पथकाने आंबोली फॉरेस्ट नाका येथे सापळा रचून केली. म्हापसा-गोवा येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा सुमो गाडी (क्रमांक MH 42 K 0269) ला अडवून तपासले असता, त्यात गुपचूप नेली जाणारी दारू सापडली.

या वाहनातून एकूण १२ बॉक्स गोवा बनावटीची विविध ब्रँडची बेकायदेशीर दारू वाहतूक केली जात होती. पोलिसांनी ४८,९६० रुपयांची दारू आणि ३,००,००० रुपयांची टाटा सुमो गाडी, असा एकूण ३,४८,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी आरोपी चालक गोपीनाथ दगडू शितोळे (वय ४०, रा. गणेशवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे) याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनीष शिंदे, लक्ष्मण काळे, रामदास जाधव, गौरव परब आणि सचिन चव्हाण यांच्या पथकाने केली. दोन्ही प्रकरणांत सावंतवाडी पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.