सावंतवाडी (प्रतिनिधी):
“गोवा म्हणजे केवळ भोगभूमी अशी होणारी बदनामी आता थांबायला हवी. ८० टक्के ग्रामीण गोव्यात दडलेली खरी संस्कृती आणि सभ्यता जगापुढे यायला हवी,” असे परखड आणि कौतुकास्पद प्रतिपादन गोव्याचे सांस्कृतिक व कला मंत्री ना. रमेश तवडकर यांनी केले. पणजीतील प्रसिद्ध पं. दीनानाथ मंगेशकर कला अकादमी येथे पार पडलेल्या विसाव्या ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ च्या महाअंतिम फेरीच्या शुभारंभ प्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
दिमाखदार सुरांचा महासंग्राम
हा सोहळा मार्सेल-गोवा सम्राट क्लब इंटरनॅशनल, गोवा कला व सांस्कृतिक मंत्रालय आणि सम्राट क्लब स्टेट-१ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत एकूण ६ अंतिम स्पर्धकांनी आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करत विजेतेपदासाठी कडाडून टक्कर दिली. देशातील नामवंत शास्त्रीय गायक पं. डॉ. राम देशपांडे यांनी या सोहळ्याला ‘महागुरू’ म्हणून उपस्थित राहून स्पर्धकांना शास्त्रीय संगीताच्या मोलाच्या टिप्स दिल्या.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या दिमाखदार सोहळ्याला सम्राट क्लब आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने सम्राट क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सम्राट संदीप निगळ्ये, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य १ चे अध्यक्ष सम्राट शशिकांत पुनाजी, सचिव सम्राट विनोद मळीक, कोषाध्यक्ष सम्राट सुबोध रामनाथकर, यजमान क्लब (सम्राट क्लब मार्शेल) चे अध्यक्ष सम्राट रोहन घाडी, मये क्लबचे अध्यक्ष नरेश पेडणेकर तसेच मंगेश गांवकर आणि सौ. स्वप्ना मातोंडकर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचा विशेष सन्मान
या सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेच्या उभारणीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये संस्थापक सम्राट सागर पानवेलकर, अक्षय खांडेपारकर, प्रसाद नाईक, योगेश हिरवे, भालचंद्र नाईक, दीपक टिळवे, गुरूदास नाटेकर, दीपक नार्वेकर, राजश्री खांडेपारकर, अविन नाईक, प्रसाद प्रभूगांवकर, अमोल फडते वेतकीकर, ॲड. अवधूत सलतकी, मंगेश गांवकर, अवधूत नाईक, पंकज नमशीकर, भालचंद्र नार्वेकर, अर्चना सिनारे, निखिल साळगांवकर आणि स्वप्ना मातोंडकर यांचा समावेश होता.
सिंधुदुर्गातूनही रसिकांची हजेरी!
या सुरांच्या महाकुंभाला गोमंतकीय रसिकांसोबतच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, विशेषतः सावंतवाडी येथील संगीतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सावंतवाडीतून नरेंद्र देशपांडे, आशुतोष चिटणीस आणि हरिश्चंद्र पवार यांच्यासह अनेक रसिकांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पर्धकांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. अत्यंत उत्साही आणि सांस्कृतिक वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.












