खेड (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन देण्यासाठी जय हनुमान विकास मंडळाच्या वतीने साखर गावातील जांभूळवाडी, सुतारवाडी आणि बौद्धवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना दप्तर तसेच विविध शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी साखर गाव मुंबई मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव उतेकर, जय हनुमान विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश उतेकर, माजी सरपंच शिवाजी उतेकर, अरुण मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णू उतेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र उतेकर, संदीप उतेकर, सुनील उतेकर यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.












