खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील गुणदे येथील सरस्वती शिक्षण संस्थेच्या सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालयामधील इ.५ वी ते इ.१० वी मध्ये प्रथम क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थीनीना दीपक नोव्हाकेम लिमिटेड लोटे तर्फे दिपकन्या शिष्यवृत्ती अंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित दीपक नोव्हाकेमच्या श्रीम. बर्नाली सेनगुप्ता हेड एच. आर, अमोल अकुलकर-एच.आर. मॅनेजर, कौस्तव भट्टाचार्य-एच. आर. मॅनेजर, स्वप्नील परब-आय.टी. मॅनेजर, साहिल शिर्के- प्रोजेक्ट एक्झिक्युटिव तसेच सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र आंब्रे (माजी जिल्हा परिषद सदस्य), ज्येष्ठ संचालक संजय आंब्रे (उपाध्यक्ष, अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान), राजेंद्र विष्णू आंब्रे, प्रकाश आंब्रे तसेच कै. डॉ. अशोक आंब्रे स्मृती वाचनालयाचे उपाध्यक्ष शिवाजी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते सरस्वती शिक्षण संस्थेच्या पोर्चमध्ये श्रीगणेश पूजन, श्री सरस्वती पूजन व गुरुपूजन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन करून संस्थेचे सचिव राजेंद्रजी द. आंब्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सरस्वती शिक्षण संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात स्वागत गीताने सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांना संस्थेतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कारित करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कु. आराध्या जगदीश आंब्रे इ. ५वी (१० हजार रूपये), कु. संचिता नितीन पाटील इ.६वी (११ हजार रूपये), कु. सिया सूर्यकांत खरात इ.७वी (१२ हजार रूपये), कु. पंकजा पंडित नागरगोजे इ.८ वी (१३ हजार रूपये), कु. समृद्धी हेमंत सूर्यवंशी इ.९वी (१४ हजार रूपये), कु. जान्हवी विजय नटे इ.१०वी (१५ हजार रूपये) रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले. सरस्वती शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक संजय दत्ताजीराव आंब्रे यांनी कंपनीच्या सदरच्या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या व आपल्या विषयाचा १०० टक्के निकाल देणाऱ्या शिक्षकांचाही कंपनीने गौरव करावा असे त्यांनी सांगितले.
सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र दत्ताराम आंब्रे यांनी आपल्या भाषणातून बोलताना दिपकन्या शिष्यवृत्ती उपक्रम विद्यार्थीनीना त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण करण्यास उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. तसेच संस्थेच्या सभागृहाचे संपूर्ण सिलिंग करून सदरचे सभागृह ए.सी. सुविधा व अद्ययावत करून देण्याची मागणी कंपनीकडे केली. त्यावर बोलताना दीपक नोव्हाकेमच्या हेड एच. आर. श्रीम. बर्नाली सेनगुप्ता म्हणाल्या की, कंपनी मार्फत विविध समाज कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सदरच्या सभागृहाचे सिलिंग काम व सभागृह अद्ययावत करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. सरस्वती शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रांत दत्ताजीराव आंब्रे, व्हा. चेअरमन अरविंद गोविंद आंब्रे, शाळा समिती अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर बाळकृष्ण आंब्रे व संस्थेचे सर्व सहकारी संचालक, सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालय, गुणदेच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी जोशी यांनी सदरच्या उपक्रमाप्रती प्रशंसोद्गार काढले व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. संस्था संचालक प्रकाश आंब्रे यांनी मान्यवरांचे आभार मानले. प्रभारी मुख्याध्यापक मनोज कासार यांनी कार्यक्रमाचे उत्तमरीत्या नियोजन केले. कार्यक्रमाला गुरुकुल विद्यामंदिर गुणदेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अनिता विचारे, सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.













