ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव गोठणकर यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार जाहीर

राजापूर (वार्ताहर): सामाजिक न्याय, समता आणि बंधुभावपूर्ण समाजनिर्मितीसाठी सातत्याने कार्य करणारे येथील बौध्द समाजाचे नेते व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव कृष्णाजी गोठणकर यांना कोकण विभागातून “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे.

विवेक विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे व राज्यातील विविध सामाजिक सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सामाजिक परिवर्तन, संविधानिक मूल्यांचा प्रसार आणि समाजातील वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी तसेच राजापूर तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर भव्य स्मारक उभारणी, तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामधील कामगिरी, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व महादेव कृष्णाजी गोठणकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यार्थ त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, डॉ. शरणकुमार लिंबाळे व पद्मश्री दादा इदाते या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. श्री. गोठणकर यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.