CSEET प्रवेश परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलचे १०० टक्के यश, १२वी वाणिज्य शाखेतील आठ विद्यार्थी CS एक्झिक्युटिव्हसाठी पात्र

खेड (प्रतिनिधी) :– द इनस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) यांच्या वतीने १० जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) परीक्षेचा निकाल मंगळवार, दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. या परीक्षेत खेड येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या इयत्ता १२वी वाणिज्य शाखेतील आठ विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत शाळेची १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या यशामुळे हे सर्व विद्यार्थी पुढील टप्प्यातील कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह (CS Executive) परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
कंपनी सेक्रेटरी या प्रतिष्ठित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दरवर्षी CSEET या प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात येते. देशभरातून हजारो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसत असतात. अशा स्पर्धात्मक परीक्षेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केवळ शाळेतील मार्गदर्शक प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर उल्लेखनीय यश मिळवले आहे.
या परीक्षेत कु. प्रार्थना उमराणीकर, कु. गौरी शेठ, कु. अन्वी कानडे, कु. सिद्धांत राजेशिर्के, कु. ऋग्वेद चिखले, कु. रिया तटकरी, कु. अवधुत खेडेकर आणि कु. वेदिका शिंदे या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात CSEET परीक्षा उत्तीर्ण करत CS एक्झिक्युटिव्ह परीक्षेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
या यशामागे शाळेतील प्रा. रुपाली बोडस, प्रा. बाळासाहेब राऊत, प्रा. पारस नलावडे, प्रा. स्वप्निल पंडित, प्रा. संतोष पाटील, प्रा. अक्सा पोफळणकर, प्रा. श्रद्धा थरवळ, प्रा. शबाना मुसा, प्रा. धनुजा धूत, प्रा. सरिता भारती तसेच लॅब सहाय्यक श्री. राम शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगण्यात आले.
या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.