रसिकांसाठी विनामूल्य मेजवानी
सावंतवाडी:
पन्नास वर्षे नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नटश्रेष्ठ बालगंधर्वांच्या जयंती निमित्त सावंतवाडी येथील ‘क्षितिज इव्हेंट’ या संस्थेने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुक्रवार, २६ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता सावंतवाडी येथील आरपीडी हायस्कूलमध्ये बालगंधर्वांच्या संगीतमय जीवन प्रवासावर आधारित ‘बालगंधर्व : नांदी ते भैरवी’ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाची निर्मिती ‘श्री परमेश्वर प्रोडक्शन’ची असून, याची संकल्पना आणि संहीता लेखन बाळ पुराणिक यांनी केले आहे. बालगंधर्वांचा जन्म, त्यांचा रंगभूमीवरील प्रवेश, त्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिका, त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांची अत्यंत लोकप्रिय ठरलेली गाणी आणि त्यांचा उत्तरार्ध असा त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांसमोर मांडण्यात येणार आहे.
या सांगीतिक महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक आणि नाट्य अभिनेते स्वप्निल गोरे तसेच प्रसिद्ध गायिका राधा जोशी या बालगंधर्वांची पदे सादर करणार आहेत. त्यांना ऑर्गनवर प्रसिद्ध ऑर्गन वादक प्रसाद शेवडे आणि तबल्यावर अभिनव जोशी हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन बाळ पुराणिक आणि सौ. उमा जडये करणार आहेत.
हा कार्यक्रम सर्व नाट्य आणि संगीत रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. तरी सावंतवाडी व परिसरातील सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘क्षितिज इव्हेंट’ या संस्थेमार्फत करण्यात आले आहे.











