देवरूख बोटकेवाडीतील संरक्षण भिंतीचे काम पूर्ण

आमदार शेखर निकम यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीची पुन्हा झलक

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरातील बोटकेवाडी परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार शेखर निकम यांनी तातडीने निधी मंजूर करून चोरपऱ्या संरक्षण भिंतीचे काम पूर्णत्वास नेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवरुख येथील श्री सोळजाई नवतरुण मित्रमंडळ, बोटकेवाडी यांनी ११ जानेवारी २०२५ रोजी आमदार शेखर निकम यांना निवेदन सादर करून बोटकेवाडी परिसरात चोरपऱ्या काठावर संरक्षण भिंत उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या निवेदनात परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मांडण्यात आला होता. विशेषतः पावसाळ्यात होणारी मातीची धूप, रस्त्याला निर्माण होणारा धोका तसेच नागरिकांच्या जीवितास निर्माण होणाऱ्या संभाव्य संकटाची जाणीव करून देण्यात आली होती. निवेदनाची गांभीर्याने दखल घेत आमदार शेखर निकम यांनी संबंधित विभागांशी पाठपुरावा करून आवश्यक निधी मंजूर केला. त्यानंतर अल्पावधीतच संरक्षण भिंतीचे काम हाती घेण्यात आले आणि आज हे काम पूर्णत्वास पोहोचले आहे. मजबूत व दर्जेदार संरक्षण भिंत उभारण्यात आल्याने परिसरातील रस्ता सुरक्षित झाला असून भविष्यातील संभाव्य नुकसान टाळण्यास मोठी मदत होणार आहे. या कामामुळे बोटकेवाडी परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे. विशेष म्हणजे केवळ आश्वासने न देता नागरिकांच्या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याची आमदार शेखर निकम यांची कार्यशैली या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्यावर भर देणारी त्यांची लोकाभिमुख कार्यपद्धती नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरत आहे. यावेळी श्री सोळजाई नवतरुण मित्रमंडळ, बोटकेवाडी यांचे विशेष कौतुक होत आहे. परिसराच्या विकासासाठी सातत्याने पुढाकार घेणे, नागरिकांच्या समस्या संघटितपणे प्रशासनापुढे मांडणे आणि काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणे ही मंडळाची कार्यपद्धती अनुकरणीय असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. मित्रमंडळातील कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या प्रयत्नांमुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. बोटकेवाडीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली ही संरक्षण भिंत केवळ एक विकासकाम नसून लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारलेला विकासाचा आदर्श नमुना ठरला आहे. आमदार शेखर निकम यांच्या संवेदनशील नेतृत्वाला आणि श्री सोळजाई नवतरुण मित्रमंडळाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मागणीपासून मंजुरीपर्यंत आणि मंजुरीपासून प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंतचा प्रवास अल्पावधीत पूर्ण करून दाखविणे, हीच आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख आणि जनतेप्रती बांधिलकी असलेल्या कार्यपद्धतीची खरी ओळख आहे,” अशा भावना बोटकेवाडी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या.