तुमच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार; खा. नारायण राणे यांची आंबा बागायतदारांना ग्वाही

रत्नागिरी : प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्तीच्या संकटात अडकलेल्या रत्नागिरीतील आंबा बागायदारांनी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधदुर्गचे खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. त्यावेळी तुमच्या मागण्यांचा मी पाठपुरावा शासन पातळीवर करेन अशी ग्वाही खा. राणे यांनी दिली.

सन २०१५ पासून कोकणाला लागलेली नैसर्गिक संकटांची मालिका, अवकाळी पाऊस, चक्रीवादळे आणि कमालीची उष्णता यामुळे येथील मुख्य पिके धोक्यात आली आहेत. चालू हंगामात तर केवळ २० टक्के सुद्धा उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आलेले नाही, यामुळे त्रस्त बागायतदारांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
तर आपल्या या मागण्यांसाठी आज रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या खा. नारायण रांची कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था पदाधिकारी उपाध्यक्ष प्रकाश उर्फ बावा साळवी, दीपक उपळेकर, अशोक भाटकर, सदाशिव पाचकुडे आणि राजूशेठ रामगडे आदी प्रमुख पदाधिकारी यांनी भेट घेतली. यावेळी हा प्रश्न मुख्यमंत्रांपर्यंत नेल्याचं सांगत खा. राणे यांनी या मागण्यांची आणि समस्यांची मला चांगली माहिती आहे. त्याबाबत शासनापर्यंत मुख्यमंत्र्यांसमोर याची मांडणी करण्यात असल्याचे सांगत तुमच्या मागण्यांचा मी पाठपुरावा करेन अशी ग्वाही खा. राणे यांनी आंबा बागायदारांना दिली आहे.