उद्धव ठाकरे यांच्या अणुऊर्जा प्रकल्पांच्या विरोधाच्या भूमिकेवरही केली घणाघाती टीका
रत्नागिरी (प्रतिनिधी)
औद्योगिक क्रांतीमुळेच विकास होतो व त्यातूनच नोकऱ्यांसह रोजगार प्राप्त होतो. त्यामुळे याठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आता आला तर आम्ही त्याचे स्वागतच करू आणि जो कोणी आंदोलन करून त्याला विरोध करेल मग आम्ही समोरून काय करतो ते पाहा, अशी रोखठोक भूमिका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत मांडली. यावेळीच त्यांनी उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधाच्या भूमिकेवरही घणाघाती टीका केली.
रत्नागिरी येथे प्रभारी जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या उपस्थितीत खा. नारायण राणे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातून जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या तरतुदी आणि पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाचा तसेच विविध योजनांचा आणि कामाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी, राजापूर तालुक्यात नव्याने प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला पुन्हा िवरोध झाल्याबद्दल विचारले असता खा.नारायण राणे यांनी आता जर अणुऊर्जा प्रकल्प आला तर आम्ही त्याचे स्वागतच करू असे सांगतानाच मी स्वत: या मर्जीचा असल्याचे स्पष्ट केले. यावेळीच त्यांनी आणखी चार दिवस पाऊस पडला नसता तर पाण्याबरोबर आपल्याला वीज देखील मिळाली नसती, अंधारात राहण्याची वेळ आली असती असे स्पष्ट केले. राजापुरातील अणूऊर्जा प्रकल्प झाला असता तर राज्याला, लोकांना, इंडस्ट्रीला पुरेल एवढी वीज निर्मिती झाली असती. त्याला अनुसरून अनेक उद्योग, व्यवसाय सुरू झाले असते. हजारो तरूणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. बेरोजगारी दूर झाली असती. म्हणून अणुऊर्जा प्रकल्प जिल्ह्यात हवाच. जर प्रकल्प पुन्हा येणार असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करणार अशी रोखठोक भूमिका खा. राणे यांनी मांडतानाच प्रकल्पाविरोधी आंदोलन कराच, मग समोरून काय करतो ते बघा, असा इशाराही विरोधकांना दिला. यावेळीच त्यांनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला. अणु प्रकल्पाला विरोध करणारे नेमके कोण होते? उद्धव ठाकरे होते. त्यांनी पैसे खाल्ले आणि ते गप्प बसले. त्यांच्या या राजकारणामुळे प्रकल्प तर गेलाच, पण सोबतच कोकणातील हजारो तरुणांचा रोजगार आणि व्यवसायही हिरावला गेला, असा घणाघाती आरोपही खा. राणेंनी केला.
जिल्ह्यातील आरोग्य आणि कुपोषणाच्या मुद्द्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. रत्नागिरी जिल्ह्यात ६३२, तर सिंधुदुर्गात १०० कुपोषित बालके आहेत. सरकार गरोदर मातांना सर्व आवश्यक सुविधा देत असले, तरी नातेवाईकांनीही त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. कुपोषण मुक्तीसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी प्रत्येकी दोन कुपोषित मुले दत्तक घेऊन त्यांना सुदृढ करावे, असे आवाहन त्यांनी केले. रत्नागिरीच्या दरडोई उत्पन्नात वाढ होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना लोकांचे उत्पन्न वाढून ते आता २ लाख ४५ हजार रुपयांवर पोहोचल्याचेही त्यांनी नमूद केले. पोस्ट कार्यालयातून बंद झालेली रेल्वे रिझर्व्हेशनची सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ‘कवचकुंडले’च्या आरोपांचा समाचार घेताना, अशा विधानांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा उल्लेख करणे पूर्णपणे चुकीचे आणि अनावश्यक असल्याचे सांगत खा.राणेंनी राऊतांना सुनावले. बाळासाहेबांची शिवसेना उभी राहताना आपण स्वतः पाहिली आहे आणि त्यासाठी प्रचंड मेहनतही घेतली आहे, त्यामुळे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असलेल्या या पक्षाचा अस्त होताना पाहताना नक्कीच वाईट वाटते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आज आपल्याला वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचीच आठवण येते, असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले. यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन टायगर’ची मोठी चर्चा झाली, पण मला अजूनही समजलेलं नाही की त्याला हे नाव का दिलं गेलं? त्यांच्याकडे ( उबाठा सेना) वाघ शिल्लक तरी कुठे आहेत? आणि जे सहा जण पक्षातून बाहेर पडले, त्यांच्यातही मला कुठे वाघाचे गुणधर्म दिसले नाहीत,” अशा कडक शब्दांत समाचार घेतला.
खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासनाचा आढावा, रखडलेले रस्ते आणि विविध विकासकामांवर सविस्तर भाष्य केले. जिल्हाधिकारी मनुज जिंदल उपस्थित नसले तरी अन्य अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती समाधानकारक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खा.नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेवेळी त्यांच्यासोबत भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित होते.
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी ना. नितीन गडकरींची भेट घेणार – खा.नारायण राणे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबद्दल बोलताना खा. राणे म्हणाले की, आगामी गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत पूर्ण व्हावा, यासाठी आपण दिल्लीत जाऊन नितीन गडकरी यांची भेट घेणार आहोत. या रस्त्याबाबत केंद्र सरकार पूर्णपणे गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले. तर मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाच्या काही तांत्रिक बाबी शिल्लक असून अगदी थोडी कामे राहिली आहेत, मात्र तो लवकरच पूर्णत्वास जाणार असेही त्यांनी सांगितले. रत्नागिरीतील जलजीवन मिशन बाबत असलेल्या तक्रारींची दखल घेतली असून हा निधी केंद्राकडे रखडला आहे त्याचा पाठपुरावा संबंधित मंत्र्याकडे दिल्लीकडे करणार असून डिसेंबर पर्यंत हा निधीचा प्रश्न मार्गी लागेल अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएलच्या टॉवरचे प्रश्न मार्गी लागले आहेत. रत्नागिरीत जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊ असे खा. राणे यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वे संदर्भात बोलताना त्यांनी कोल्हापूर वैभववाडी मार्ग सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.












