अपना सहयोग फाउंडेशनचा आदर्श घ्यावा- मुख्याधिकारी संजय जाधव

२६५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
 महिलांना रोजगार प्रशिक्षणाचा गौरव

चिपळूण (वार्ताहर) : अपना सहयोग फाउंडेशन महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. अशा सामाजिक संस्थांचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे प्रतिपादन चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांनी केले. ते शनिवार दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता चिपळूण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे अपना सहयोग फाउंडेशनच्या अध्यक्ष व महाराष्ट्र प्रेसिडेंट जरीन रुमानी यांच्या वतीने आयोजित गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात बोलत होते.
संजय जाधव पुढे म्हणाले की, “आजही अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासारखी मूलभूत गरज पूर्णपणे मिळत नाही. गरीब व गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी अपना सहयोग फाउंडेशन आर्थिक व शैक्षणिक मदतीचे कार्य करत आहे. अशा कार्याला आपण सर्वांनी पाठबळ दिले पाहिजे.” त्यांनी अपना सहयोग फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून संस्थेला शुभेच्छा दिल्या. नगरसेवक साजिद सरगुरोह म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते. या शाळा टिकवण्यासाठी पालकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. अपना सहयोग फाउंडेशन शिक्षणाच्या माध्यमातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करून चांगले कार्य करत आहे, असे त्यांनी सांगितले.
अपना सहयोग फाउंडेशनच्या अध्यक्षा व महाराष्ट्र प्रेसिडेंट जरीन रुमानी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सांगितले की, फाउंडेशनच्या समाजसेवेच्या कार्याला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, जनजागृती, शिक्षण आणि सामाजिक मदतीच्या क्षेत्रात सातत्याने काम करण्यात आले. महिलांना स्किल डेव्हलपमेंट व रोजगार प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील वर्षी ३५ मुलींना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेतील २६५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले. “ही मुले देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक मदत करणे हे आमच्यासाठी एक छोटेसे पाऊल आहे. शिक्षणाला नेहमीच प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा आणि सहकार्य देत राहू, असे जरीन रूमाणी यांनी सांगितले.
जि.प. शिक्षिका नाजिया काजी यांनी अपना सहयोग फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, त्या गेल्या सात वर्षांपासून फाउंडेशनचे कार्य पाहत असून संस्था समाजासाठी सातत्याने चांगले काम करत आहे. विशेषतः जरीन रुमानी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास देण्याचे मोठे काम झाले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिला घराबाहेर पडून विविध क्षेत्रांत सक्रिय झाल्या असून आज अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे नाजिया काजी यांनी सांगितले. या शैक्षणिक उपक्रमात शैक्षणिक साहित्याकरिता अन-नूर-फाऊंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांसाठी वह्या उपलब्ध करून देण्यात त्यांच्या संस्थेचा विशेष सहभाग होता. अपना सहयोग फाउंडेशनने त्यांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात अपना सहयोग फाउंडेशनच्या अध्यक्ष व महाराष्ट्र प्रेसिडेंट जरीन रुमानी यांच्यासह तालुकाध्यक्ष फातिमा चौगुले, उपाध्यक्ष सरवरी चौगुले, तालुकाध्यक्ष जुनेद बगदादी, खजिनदार जमीला शाह, लेडीज कॉर्डिनेटर शाकिरा लोक्रे, फाउंडेशनच्या मेंबर रुक्सार नाईक, मर्जिया खेरटकर आणि सलमा पालोजी तसेच संपूर्ण महिला टीम व इतर सदस्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. कार्यक्रमाला उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, उद्योजक शादाब फझलानी, समीर मेडिकलचे संचालक नईम धामस्कर, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कादिर अ. रेहमान परकार, कोकणी न्यूजचे मुक्तार सुर्वे, जि.प. शिक्षिका नाजिया काजी, जि.प. मराठी शाळा मिरजोळीच्या मुख्याध्यापिका मनीषा गरजे, सहेर रुमानी, आयशा रुमानी, जैबूनीसा साठी, विनोद हिरे, मिलिंद सकपाळ, सचिन जाधव, हेमंत चव्हाण, जवाद बगदादी आणि रोहित खापरे आदी उपस्थित होते. जमीला शाह यांनी सर्वांचे आभार मानले. अपना सहयोग फाउंडेशन भविष्यातही शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, जनजागृती आणि गरजूंच्या मदतीसाठी असेच कार्य सुरू ठेवेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.