चिपळूण (प्रतिनिधी) : स्कॉन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा कोकणचे भूमिपुत्र निलेश चव्हाण यांच्या प्रेरणेतून स्कॉन प्रो फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो आणि शं. ना. चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र, पुणे यांच्या सहयोगाने रत्नागिरी येथे मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय व हात वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
यापूर्वी २४ मे २०२६ रोजी याच ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरात नोंदणी व मोजमाप झालेल्या सुमारे १५० दिव्यांग लाभार्थींना आजच्या शिबिरात अत्याधुनिक कृत्रिम पाय व हात मोफत प्रदान करण्यात आले. स्कॉन उद्योग समूहाच्या माध्यमातून श्री. निलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात विविध लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून कोकणातील दिव्यांग बांधवांसाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात लाभार्थींना प्रत्येकी सुमारे ५० हजार रुपयांहून अधिक किमतीचे अत्याधुनिक कृत्रिम पाय तसेच २० हजार रुपयांहून अधिक किमतीचे कृत्रिम हात पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे अनेक दिव्यांगांना नव्या आत्मविश्वासासह स्वावलंबी जीवन जगण्याची संधी मिळाली. प्रात्यक्षिक व प्रतीकात्मक कृत्रिम पाय-हात वितरण कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. दीपक पटवर्धन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहकार्यवाह डॉ. प्रफुल्ल सप्रे, भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र, पुणेचे केंद्रप्रमुख व विश्वस्त विनय खटावकर, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष दत्ताजी चितळे, रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रोचे अध्यक्ष विशाल भोसले, सचिव अपूर्वा ब्राह्मणे तसेच स्कॉन उद्योग समूहाचे युवा नेतृत्व निनाद चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निनाद निलेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात या सामाजिक उपक्रमामागील स्कॉन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश चव्हाण यांची भूमिका आणि अशा लोकोपयोगी उपक्रमासाठी स्कॉन समूह सदैव आपला सहभाग नोंदवेल अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पूरकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली “सेवा हीच खरी समाजप्रतिबद्धता” या भावनेतून स्कॉन उद्योग समूहाने राबविलेल्या या उपक्रमामुळे १५० दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात नव्या आशा, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा प्रकाश निर्माण झाला असून, सामाजिक उत्तरदायित्वाचा एक प्रेरणादायी आदर्श समाजासमोर उभा राहिला आहे.









