कात्रोळीत ‘स्पर्धा परीक्षा पुस्तकपेढी’चा अनोखा उपक्रम

यूपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत
 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी पुस्तकांनी गौरव
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कात्रोळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील यूपीएससी व एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षा पुस्तकपेढी’ या अनोख्या उपक्रमाची सुरुवात ६ सप्टेंबर रोजी करण्यात आली. ग्रामपंचायत आणि दानशूर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या या पुस्तकपेढीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक पुस्तके मोफत उपलब्ध होणार आहेत.
गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करताना पुस्तकांचा खर्च अडथळा ठरू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमासाठी कात्रोळीतील बहुसंख्य ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सढळ हस्ते आर्थिक सहकार्य केले. त्यामुळे ग्रामस्थांच्या सहभागातून उभी राहिलेली ही पुस्तकपेढी विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. यावेळी गावातील दहावी, बारावी तसेच पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक साहित्य न देता त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने तुकाराम मुंढे यांच्या जीवनावरील ‘तुकाराम’ तसेच विश्वास नांगरे-पाटील यांचे ‘मन में है विश्वास’ ही प्रेरणादायी पुस्तके भेट देण्यात आली.
दरम्यान, कात्रोळी गावचा ‘लिटिल चॅम्पियन’ इयत्ता नववीतील विध्यार्थी अद्वैत संदिप जाधव याचाही विशेष सत्कार करण्यात आला. गोळाफेक स्पर्धेत गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील खेळाडूंमध्ये द्वितीय क्रमांक मिळवत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रमोद सुरेश निवळकर, सरपंच श्रीकांत मोहन निवळकर, प्रशासक शिंदे, कात्रोळी सोसायटीचे चेअरमन संदिप घाग यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची दिशा देतानाच यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रेरणादायी साहित्य देण्याचा कात्रोळी ग्रामपंचायतीचा उपक्रम इतर गावांसाठीही अनुकरणीय ठरत आहे.