दोडामार्ग प्रतिनिधी :
दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे-मधलीवाडी येथील एका २४ वर्षीय तरुणाचा शेतातील विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मेघशाम विलास गवस असे या मयत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण पिकुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पिकुळे (मधलीवाडी) येथील मेघशाम गवस हा युवक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाला होता. नातेवाईक व स्थानिक पातळीवर त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ शेतात गेले असता, त्यांना परिसरात दुर्गंधी येऊ लागली. संशय आल्याने त्यांनी आजूबाजूला आणि शेतातील विहिरीत शोध घेतला असता, मेघशामचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना आढळून आला.
या धक्कादायक घटनेची माहिती आशिष उमेश गवस (वय ३८, रा. पिकुळे-मधलीवाडी) यांनी तात्काळ दोडामार्ग पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीबाहेर काढला आणि घटनेचा पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात सध्यातरी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.












