न्यू इंग्लिश स्कूल, लांजा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व अमली पदार्थ विरोधी दिन साजरा

लांजा (प्रतिनिधी) न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती तसेच जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शाहू महाराजांच्या कार्याचा व विचारांचा गौरव केला.

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींनी प्रभावी मूकनाट्य सादर केले. या मूकनाट्यातून अमली पदार्थांच्या व्यसनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले. मूकनाट्याचे दिग्दर्शन रसाळ मॅडम यांनी केले.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री.आजगावकर, उपमुख्याध्यापक श्री. वाघाटे, पर्यवेक्षक रवींद्र वासुरकर, ज्येष्ठ प्राध्यापिका श्रीमती पाटील , उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री.सरवळे, कार्यक्रम विभागप्रमुख कांबळे, एम. आर. जाधव तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.