खेडच्या शाकिर तिसेकर यांची आंतरराष्ट्रीय झेप

ऑस्ट्रेलियातील University of Technology Sydney मधून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पदव्युत्तर पदवी; हायर फर्स्ट क्लासने मिळविले यश

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील फुरूस येथील शाकिर हिशामउद्दीन तिसेकर यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील University of Technology Sydney (UTS) मधून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) या विषयात हायर फर्स्ट क्लास श्रेणीत पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) संपादन करून फुरूस गावासह खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
शाकिर यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईतील होली क्रॉस हायस्कूल, कुर्ला येथे पूर्ण केले. त्यानंतर भारती विद्यापीठ, बेलापूर येथून कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी शाखेतील डिप्लोमा पूर्ण केला. पुढे त्यांनी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेतील बी.टेक. पदवी 9.5 सीजीपीएसह संपादन केली. उच्च शिक्षणाची आवड आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्याच्या ध्येयातून त्यांनी ऑस्ट्रेलियातील University of Technology Sydney (UTS) येथे प्रवेश घेतला आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अत्याधुनिक विषयात पदव्युत्तर पदवी उच्च श्रेणीत प्राप्त केली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे भविष्यातील तंत्रज्ञानाचा पाया मानले जात असून, जगभरात या क्षेत्राला मोठी मागणी आहे. अशा स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक क्षेत्रात मिळविलेल्या या यशामुळे शाकिर यांनी आपल्या गुणवत्तेची आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडली आहे.
शाकिर यांच्या यशामागे त्यांचे वडील हिशामउद्दीन अमीन तिसेकर आणि आई शबनम तिसेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. मुंबई विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या त्यांच्या पालकांनी शिक्षणाला प्राधान्य देत शाकिर यांना प्रत्येक टप्प्यावर भक्कम पाठिंबा दिला.
शाकिर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.