इनडोअर क्रीडा आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी :क्रीडा क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने यावर्षीही पुण्यश्लोक हि. हा. श्रीमंत मेजर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये कॅरम, बॅडमिंटन, बुद्धीबळ, टेबल टेनिस आणि चित्रकला अशा विविध इनडोअर स्पर्धांचा समावेश असून, या स्पर्धा ४ जुलै ते ७ जुलै २०२६ दरम्यान सावंतवाडी नगरपरिषदेच्या जिमखाना मैदानाकडील स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये रंगणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर यांनी दिली आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत बॅडमिंटनसाठी इयत्ता १ ली ते ५ वी, ६ वी ते १० वी आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये सामने होतील. टेबल टेनिस स्पर्धेत १४ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि खुला गट अशी विभागणी करण्यात आली आहे. कॅरम स्पर्धेत १४ वर्षांखालील, १८ वर्षांखालील आणि खुला गट अशा तिन्ही गटांसाठी सिंगल व डबल स्वरूपात सामने खेळवले जातील. बुद्धीबळ स्पर्धेत १९ वर्षांखालील, १६ वर्षांखालील आणि खुल्या गटाचा समावेश असेल. चित्रकला स्पर्धेसाठी वयोगटानुसार विषय निश्चित करण्यात आले असून, इयत्ता १ ली ते ५ वी साठी ‘स्वच्छ सुंदर सावंतवाडी’, ६ वी ते १० वी साठी ‘पर्यटनाची पंढरी, मोती तलाव आणि सावंतवाडीचे वैभव’, तर इयत्ता ११ वी ते १२ वी आणि महाविद्यालयीन (FY, SY, TY) विद्यार्थ्यांसाठी ‘प्रजाहितदक्ष राजा श्रीमंत बापूसाहेब महाराज’ असा विषय देण्यात आला आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. खुल्या गटातील खेळाडूंसाठी सिंगल प्रकाराकरिता १०० रुपये आणि डबल प्रकाराकरिता २०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाईल. नियमानुसार प्रत्येक क्रीडा प्रकारातील प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धक असणे आवश्यक आहे, तसेच प्रत्येक खेळाडूला कोणत्याही एकाच क्रीडा प्रकारात आणि एकाच वयोगटात खेळण्याची परवानगी असेल. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांनी आणि खेळाडूंनी आपली नावे १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालयातील संबंधित क्रीडा प्रकारातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे नोंदवणे बंधनकारक आहे. या भव्य क्रीडा महोत्सवाचे रीतसर उद्घाटन ४ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता जिमखाना येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होईल, तर स्पर्धांचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ ७ जुलै २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता याच ठिकाणी संपन्न होणार आहे. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.













