वेंगुर्ला । प्रतिनिधी:
परुळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. प्राजक्ता प्रसाद पाटकर यांची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाजाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. सिंधुदुर्ग परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी सौ. प्राजक्ता पाटकर यांचे कौतुक केले. पाटकर मॅडम यांनी आपली उत्तरोत्तर प्रगती करावी आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठावे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी ईश्वरचरणी केली. समाजातील महिला अशा प्रकारे राजकारणात आणि समाजकारणात पुढे येत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना उपसरपंच सौ. प्राजक्ता पाटकर म्हणाल्या की, परीट समाजाने अत्यंत आपुलकीने केलेला हा सत्कार मी कधीही विसरू शकत नाही. या सत्काराने माझी जबाबदारी वाढली असून, आगामी काळात परीट समाजाच्या प्रत्येक कार्यात आणि अडीअडचणीत मी सर्वतोपरी मदत करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या सत्कार सोहळ्याला परीट समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर, जिल्हा सेक्रेटरी अनिल शिवडावकर, जिल्हा सह सेक्रेटरी गुरुनाथ मडवळ, सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष राजू भालेकर, कुडाळचे तालुकाध्यक्ष सदा अनावकर, ज्येष्ठ मार्गदर्शक संजय कुडाळकर, प्रदेश सदस्या सौ. सविता कुडाळकर, आणि महिला सदस्या सौ. अनुष्का शिवडावकर यांच्यासह समाजातील इतर मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













