कुडाळ:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी सावंतवाडी येथील नामांकित ‘मुक्ताई ॲकेडमी’च्या वतीने रविवार, दिनांक ५ जुलै रोजी कुडाळ येथे एक दिवसीय कॅरम आणि बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर पाच वर्षांवरील सर्व मुलगे आणि मुलींसाठी खुले असेल.
कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:०० या वेळेत हे शिबीर पार पडणार आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना कॅरम व बुद्धिबळ या खेळांचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाईल. यासोबतच ॲकेडमी, शालेय स्तर आणि असोसिएशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा, त्यातील गुणदान पद्धती आणि या खेळांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला होणारे फायदे याविषयी तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
मुक्ताई ॲकेडमी गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिरे आणि स्पर्धांचे यशस्वी आयोजन करत आहे. ॲकेडमीच्या अनेक आजी-माजी विद्यार्थ्यांनी शालेय तसेच असोसिएशनच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून पारितोषिके पटकावली आहेत. संस्थेच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुक्ताई ॲकेडमीला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर “बेस्ट ॲकेडमी” पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे.
या शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी कुडाळ व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे समन्वयक श्री. कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे. नाव नोंदणी आणि इतर सविस्तर माहितीसाठी इच्छुकांनी श्री. कौस्तुभ पेडणेकर यांच्याशी ८००७३८२७८३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.












