रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र बैठक घेऊन रस्त्यांतील अडचणी दूर करण्याचे संकेत
फळबागांमध्ये गवत काढणीचा समावेश करण्याबाबत मंत्री भरत गोगावले यांचे सकारात्मक आश्वासन
चिपळूण (प्रतिनिधी) : पावसाळी अधिवेशन २०२६-२७ दरम्यान आमदार शेखर निकम यांनी कोकणातील विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रखडलेल्या पालन/ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे उपस्थित केला. माजी मंत्री भुमरे यांच्या कार्यकाळात अनेक रस्त्यांना मंजुरी मिळाली असली, तरी अद्याप एकही रस्ता पूर्णत्वास गेला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. रस्ते मंजुरी व कामांमध्ये येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची स्वतंत्र बैठक तातडीने घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच रोजगार हमी योजनेतील एमआरएस अंतर्गत गवत काढणीचा समावेश करण्यात आला असून, वनवे रोखण्यासाठी आणि फळबागांचे संरक्षण करण्यासाठी फळबागांमधील गवत काढणीचाही या योजनेत समावेश करावा, अशीही त्यांनी सूचना केली.
यावर उत्तर देताना ना. भरत गोगावले यांनी आ. शेखर निकम यांनी मांडलेला मुद्दा कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री उदय सामंत आणि संबंधित मंत्र्यांसोबत याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती देत, कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी स्थानिक परिस्थितीनुसार स्वतंत्र नियम करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांचीही मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले. वनव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडे, जंगल आणि जनावरांचे नुकसान होत असल्याचे नमूद करत, पूर्वी शेतीसाठी गवत काढले जात असल्याने अशी समस्या कमी होती. मात्र, आता गवत मोठ्या प्रमाणात साचत असल्याने वनव्यांचा धोका वाढत आहे, असेही ना. गोगावले यांनी सांगितले. फळबागांतील गवत काढणीचा रोजगार हमी योजनेत समावेश करता येईल का, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.












