▪️कृषी दिन विशेष….
मसुरे | झुंजार पेडणेकर
“काळ्या मातीत मातीत, तिफन चालते …” हे शेतगीत आठवले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो आपला बळीराजा. १ जुलै हा दिवस महाराष्ट्रात ‘कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवणारे, हरित क्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त हा दिवस त्यांच्या स्मृतीला आणि शेती क्षेत्राला समर्पित केला आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या अन्नदात्याच्या कृतज्ञतेचा हा दिवस आहे.
आजची शेती आणि जुनी शेती यात मोठा बदल झाला आहे. पूर्वी केवळ पावसाच्या पाण्यावर आणि पारंपरिक पद्धतींवर अवलंबून असणारी शेती आता आधुनिकतेकडे वळली आहे. ट्रॅक्टर, पॉवर टिलर पासून सुरु झालेला हा प्रवास आता थेट शेतात ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी, उपग्रहाद्वारे हवामानाचा अंदाज आणि स्वयंचलित ठिबक सिंचन, एआय तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे. तंत्रज्ञानाच्या या वापरामुळे कष्ट कमी झाले असून उत्पादकतेत वाढ झाली आहे.
परंतु, हे सर्व होतं असताना आजचा शेतकरी अनेक गंभीर आव्हानांचा सामना करत आहे. ‘हवामान बदल’ हे आज शेतीपुढील सर्वात मोठे संकट बनले आहे. चालू हंगामात तर ‘अल निनो ‘ ने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळवले आहे.अवेळी बरसणारा पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे. त्यातच बाजारपेठेतील भावाची अनिश्चितता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेती अनेकदा तोट्याची ठरू लागली आहे.
अशा कठीण परिस्थितीतही एक आशेचा किरण नक्कीच दिसत आहे. आजची सुशिक्षित आणि तरुण पिढी शेतीकडे एक ‘व्यवसाय’ म्हणून पाहत आहे. कॉर्पोरेट नोकऱ्या सोडून काही तरुण आधुनिक शेतीकडे वळत आहेत. केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता सेंद्रिय शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाणारी शेती, फळबाग लागवड आणि यासोबतच दुग्धव्यवसाय व शेळीपालन यांसारख्या पूरक व्यवसायांकडे शेतकऱ्यांचा ओढा सुरु झालाय. जिल्ह्याचे वाढलेले दूध संकलन याचे उत्तम उदाहरण देता येईल.
जिल्ह्याचा विचार करता शहराकडील वाढते स्थलांतर आणि कमी झालेला जन्मदर यामुळे शेतीत काम करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव प्रामुख्याने दिसून येत आहे. यातून मार्ग काढत शेतकरी शेती करत असला तरी बदलणारे वातावरण शेतकऱ्याचा हिरमोड करत आहे.
सध्या हवामान खात्याकडून ‘अल निनो’ या हवामान बदलाची मोठी चर्चा सुरू आहे. ‘अल निनो’मुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा पाऊस लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जिल्ह्यातील आपली शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. परंतु, चिंता करण्यापेक्षा ‘नियोजन’ करणे हाच या संकटावर मात करण्याचा खरा उपाय आहे.अल निनो हे एक आव्हान मानून योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर आपण हे वर्षही यशस्वीपणे पार पाडू यात शंका नाही!
सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय जवान, जय किसान, जय विज्ञान!













