डॉ. सोपान शिंदे यांनी जिल्ह्यातील सहकार चळवळीला दिले नवीन चैतन्य : सुनील राऊळ

डॉ. शिंदे यांचा पतसंस्था फेडरेशन व जिल्ह्यातील पतसंस्थांतर्फे सेवानिवृत्तीपर गौरव

सिंधुदुर्ग । प्रतिनिधी : जिल्हा उपनिबंधक पदाचा अतिरिक्त भार असूनही डॉ. सोपान शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार चळवळीला एक नवीन चैतन्य आणि ऊर्जा दिली. शासनाचा अधिकारी असूनही त्यांनी नेहमी सहकारातील एक सजग कार्यकर्ता म्हणूनच काम केले आणि जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यावर भर दिला, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन व जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांच्या वतीने जिल्ह्याचे मा. जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे साहेब हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याबद्दल त्यांचा सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून बोलताना सुनील राऊळ यांनी डॉ. शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला.

श्री. राऊळ पुढे म्हणाले की, शिंदे म्हणजे एक अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व आहे. शासकीय सेवेत रुजू झाल्यापासून त्यांच्या कार्याचा आलेख नेहमी चढता राहिला आहे. असे अभ्यासू व कर्तव्यदक्ष नेतृत्व आपल्या जिल्ह्याला लाभणे हे आपले भाग्य होते. त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये अल्पावधीत सुद्धा सहकार चळवळ प्रभावीपणे व सक्षमपणे चालवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले, जे भविष्यात सहकारवाढीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

यावेळी बोलताना श्री. काकडे यांनी डॉ. शिंदे साहेबांच्या कायदेशीर अभ्यासाचे कौतुक केले. शिंदे साहेबांचा कायदा व त्यातील तरतुदींबाबत गाढा अभ्यास असून त्यांनी शासकीय परिपत्रकाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. तसेच त्यांच्याच संकल्पनेतून ‘सहकार सोपान क्यूआर कोड ग्रंथालय’ तयार करण्यात आले, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी सहकारातील महत्त्वाची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. सोपान शिंदे भावूक झाले. ते म्हणाले, प्रत्येक माणसाने आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राबद्दल अधिकाधिक ज्ञान घेणे आवश्यक आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून जीवन जगल्यास आपल्यामध्ये परोपकाराचे विचार निर्माण होतात. आपण जीवनात नेहमी दुसऱ्यांना सहाय्य करण्याचा मानस ठेवावा.

या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन व जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांच्या वतीने डॉ. सोपान शिंदे साहेबांचा जाहीर सत्कार करून त्यांना पुढील सेवानिवृत्त जीवनासाठी भावपूर्ण शुभेच्छा देण्यात आल्या.

या सोहळ्याला पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष श्री. जॉय डॉन्टस, उपाध्यक्ष श्री. नंदकिशोर कोरगावकर, श्री. सुनील नाईक, संचालक ॲड. श्री. समीर वंजारी, श्री. सुभाष चौधरी, श्री. विष्णू पराडकर, तज्ञ संचालक श्री. रमेश बोंद्रे, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. कविटकर, कोल्हापूरचे सनदी लेखापाल श्री. सुनील नागावकर, कुडाळचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) श्री. हिर्लेकर, पतसंस्था फेडरेशनचे व्यवस्थापक श्री. महेश्वर कुंभार, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. नितीन वाळके, विद्यासेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. पांडुरंग काकतकर, वैभवशाली श्री. देव रामेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. महेश सांबारी, स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री. उसगावकर, प.पु. भालचंद्र महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. ब्रम्हदंडे, वैश्यसमाज पतसंस्थेचे श्री. पावसकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांचे पदाधिकारी, व्यवस्थापक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन पतसंस्था फेडरेशनचे व्यवस्थापक श्री. महेश्वर कुंभार यांनी केले.