सहकारातून विकास मार्गदर्शन शिबीर संपन्न
सावंतवाडी । प्रतिनिधी : सहकार चळवळ ही प्रत्येक व्यक्तीचे जीवन आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी महत्त्वाची चळवळ असून युवकांनी याचा सखोल अभ्यास करून यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी मांडले. शासन कालपरत्वे सहकार कायद्यात बदल करून या माध्यमातून समाजाला अधिकाधिक सेवा देण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सहकार सप्ताहाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. सावंतवाडी आणि सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे ‘सहकारातून विकास’ या विषयावर मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सावंतवाडी सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक सुनील मरभळ, फेडरेशनचे कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, संचालक ॲड. समीर वंजारी, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष व फेडरेशनचे संचालक श्री. कविटकर, सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी राजन आरोंदेकर, फेडरेशनचे व्यवस्थापक महेश्वर कुंभार, प्राध्यापक प्रसाद बर्वे आणि प्राध्यापक शेटकर सर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी सहकार सप्ताहाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सहाय्यक निबंधक सुनील मरभळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहकार खात्यात काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रतेची माहिती दिली, तसेच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध रोजगार आणि सेवांच्या संधींवर सविस्तर प्रकाश टाकला. सहकार चळवळीच्या माध्यमातून पतसंस्था, विकास संस्था, गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने आणि दुग्ध संस्था यांसारख्या अनेक संस्था स्थापन करून लोकांना व कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येते. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून सेवा देणारी ही एक अत्यंत महत्त्वाची चळवळ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या मार्गदर्शन शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













