मसुरे | झुंजार पेडणेकर :गेल्या वर्षभरापासून हक्काच्या जागेअभावी पर्यायी ठिकाणी भरणाऱ्या पळसंब गावठाणवाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या निधीतून या अंगणवाडी इमारतीची दुरुस्ती पूर्ण झाली असून गुरुवारी या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. दुरुस्तीनंतर नव्या दिमाखात सजलेल्या या अंगणवाडीत पाऊल ठेवताना चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
पळसंब गावठाणवाडी येथील अंगणवाडी इमारतीची दुरवस्था झाली होती. या इमारतीची दुरुस्ती व्हावी यासाठी ग्रामस्थांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर ‘जिल्हा वार्षिक योजना (अंगणवाडी दुरुस्ती) सन २०२५-२६’ अंतर्गत या कामाला मंजुरी मिळाली होती. अंदाजे २,४९,९९८/- रुपयांच्या निधीतून या अंगणवाडीच्या नूतनीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.
यावेळी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर
उपसरपंच श्री. अविराज परब, श्री. राजन पुजारे, श्री. रुपेश पुजारे, श्री. अशोक जुवेकर, श्री. सीताराम परब, श्री. संतोष परब
अंगणवाडी सेविका निखिता पुजारे आणि मदतनीस सुनेत्रा सुधाकर परब आदी उपस्थित होते.
अंगणवाडी इमारतीचे काम सुरू असताना गेल्या वर्षभरापासून लहान मुलांच्या शिक्षणाची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून स्थानिक देवस्थान कमिटीने आपल्या जागेत अंगणवाडी भरवण्यास सहकार्य केले होते. या कृतज्ञतेची जाणीव ठेवून सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी देवस्थान कमिटीचे जाहीर आभार मानले. “देवस्थान कमिटीने दाखवलेल्या सामाजिक भान आणि सहकार्यामुळेच मुलांचे शिक्षण खंडित झाले नाही,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
वर्षभर आपल्याला आसरा देणाऱ्या देवालयाप्रती अंगणवाडीतील लहान मुलांनी आणि कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली. नूतन इमारतीत प्रवेश करताना, मुलांच्या वतीने देवालयाला एक सुंदर ‘भिंत घड्याळ’ भेट देण्यात आले. चिमुकल्यांच्या या कृतज्ञतेने उपस्थित सर्वांची मने जिंकून घेतली.













