वालावल गावाला पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज : ॲड. संग्राम देसाई

वालावल पर्यटन विकास आणि रोजगार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

ग्रामपंचायत वालावल आणि श्री देव लक्ष्मीनारायण स्थानिक सल्लागार उप समितीचे आयोजन

कुडाळ । प्रतिनिधी : देशाच्या एकूण पर्यटनामध्ये धार्मिक पर्यटनाचा वाटा साठ टक्के किंवा त्याहून अधिक
आहे. किंबहुना त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोकण हा देशातील सर्वाधिक धार्मिक स्थळे असलेला भूप्रदेश आहे. त्यातही अनेक मंदिरे ही अति प्राचीन आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिर हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आपल्या या तीर्थक्षेत्राला पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वांनी आपले योगदान देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष आणि वालावल लक्ष्मीनारायण उपसमितीचे अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यांनी केले.

ग्रामपंचायत वालावल आणि श्री देव लक्ष्मीनारायण स्थानिक सल्लागार उप समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वालावल पर्यटन विकास आणि रोजगार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. संग्राम देसाई तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, ज्येष्ठ वास्तू विशारद दिनकर सामंत तसेच माजी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालवलकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच राजेश प्रभू यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी गावच्या पर्यटन विकासासंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
वालावल हे गाव घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. अशा निसर्गातील एक सुंदर ठिकाण म्हणजे लक्ष्मीनारायणाचे प्राचीन मंदिर. सूर्यभान आणि चंद्रभान प्रभू देसाई बंधूनी चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला हे पूर्वमुखी मंदिर बांधले गेल्याचे म्हटले जाते. हे मंदिर सुख समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. मंदिराला लागून एक मोठा तलाव आहे. ते असंख्य पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी सतीश पाटणकर यांनी लक्ष्मीनारायण मंदिराचा महिमा सांगताना, लक्ष्मीनारायणाचे मंदिर असलेल्या वालावल गावाला आदि पंढरी म्हणून ओळखले जाते. पंढरपूरच्या विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा उत्सव या वालावल गावात सुरू होतो. वालावल मध्येच करली नदी आहे. हा परिसर म्हणजे पर्यटकांसाठी एक वेगळी पर्वणी असते. म्हणूनच हा गाव पर्यटन गाव भरून विकसित होण्याची गरज आहे. या गावाने अनंत शिवाजी टोपीवाले देसाई, रॉयल सर्कस चे वालावलकर, माजी मंत्री एस एन देसाई तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते देशाला दिले. त्यांची निवासस्थाने आणि गावातील त्यांचे स्थान हेपर्यटकांचे आकर्षण ठरू शकते. त्या दृष्टीने ही प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सतीश पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केले. ज्येष्ठ वास्तू विशारद दिनकर सामंत यांनी इथल्या टुमदार घरात राहण्याची उत्तम सोय आणि उत्कृष्ट मालवणी भोजन उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. तसेच यातून गावातील ग्रामस्थांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील असेही मत व्यक्त केले. वालावल गाव देशाच्या पर्यटन नकाशावर येण्यासाठी आपले सर्व प्रकारचे सहकार्य लाभेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी माजी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनीही आपले विचार मांडले. आपल्या भाषणात त्यांनी बचत गटाचे महत्त्व स्पष्ट केले. स्थानिक बचत गट आले वैविध प्रकारचे कोकणी पदार्थ पर्यटकांना उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची या भागात रांग लागेल आणि त्यातून स्थानिक महिलांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला. पर्यटन विकासाच्या या कार्यात आपले यापुढे योगदान राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमास गावच्या उपसरपंच श्रीमती कवठणकर, पाल्यावर हायस्कूलचे मुख्याध्यापक कोठावळे, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, माजी मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात नाविद्यपूर्ण कामगिरी बचावलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले.