खेड (प्रतिनिधी) : सुकिवली जिल्हा परिषद गटातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या वस्तीच्या एसटी गाड्या कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ दिल्या जाणार नाहीत. चालक-वाहकांच्या राहण्याच्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनी दिली.
आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वडगाव खुर्द येथे खेड–वडगाव एसटीच्या वस्तीच्या गाडीवरील चालक व वाहक यांच्या निवास व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी सचिन धाडवे यांनी केली. ग्रामीण भागातील एसटी सेवा सुरळीत राहण्यासाठी चालक व वाहकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, याची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून निवासस्थानी भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली.
यावेळी चालक व वाहकांच्या राहण्याच्या ठिकाणी आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन धाडवे यांनी दिले. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही अत्यावश्यक सेवा असून वस्तीच्या गाड्या बंद होणे म्हणजे विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होईल. त्यामुळे या गाड्या नियमित सुरू राहाव्यात यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एसटी कर्मचारी आणि प्रवाशांच्या हिताचे कोणतेही प्रश्न दुर्लक्षित होऊ दिले जाणार नाहीत. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वासही सचिन धाडवे यांनी व्यक्त केला.
या पाहणी दौऱ्यात शिवसेना विभागप्रमुख महिपत घोलप, संपर्कप्रमुख महेशराव मोरे, विभागीय सचिव दिलीप साबळे, शाखाप्रमुख महादेव मोरे तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील एसटी सेवा अधिक सक्षम आणि अखंडित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रत्यक्ष पाहणी व पाठपुराव्याचे स्वागत स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.













