रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील सोमेश्वर येथील विवाहितेने आजारपणाला कंटाळून तेथील पुलावरुन खाडीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 13 जून रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
रमिजा इफ्तिखार हुश्ये (38,रा.मुसलमानवाडी सोमेश्वर,रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. रमिजा ही मधूमेह आजाराने त्रस्त होती. काही दिवसांपूर्वी ती आपल्या जुना फणसोप येथे माहेरी गेली होती. शनिवारी सकाळी ती माहेराहून सोमेश्वर येथील आपल्या सासरी येण्यासाठी निघाली होती. ती घरी न आल्यामुळे तिचा पती इफ्तिखार हुश्ये याने आजुबाजुला तसेच नातेवाईकांकडे शोध घेउन पत्नी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत खबर दिली होती. दरम्यान, शनिवारी दुपारच्या सुमारास हातीस येथे रमिजा हुश्येचा मृतदेह मिळून आला.
या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. दरम्यान, सोमेश्वर येथील नागरिकांनी जिल्हा शासकिय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरा रमिजाचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.












