Breaking News : जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली; खेड तालुक्यात सतर्कतेचा इशारा

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता भरणे नाका पुलाजवळ नदीची पाणीपातळी 5.10 मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, ती 5.00 मीटरच्या इशारा पातळीपेक्षा अधिक आहे. नदी धोक्याच्या 7.00 मीटर पातळीपासून अद्याप खाली असली तरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून, जगबुडी नदी दुथडी भरून वाहत आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.