कृषी दिनानिमित्त पंचायत समितीकडून गौरव; वेळेत घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण
दोडामार्ग:प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) २०२५-२६ अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून घोटगेवाडी ग्रामपंचायतीने दोडामार्ग तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंचायत समिती दोडामार्गच्या वतीने घोटगेवाडी ग्रामपंचायतीचा प्रमाणपत्र देऊन जाहीर गौरव करण्यात आला.
कृषी दिनानिमित्त १ जुलै रोजी आयोजित शेतकरी मेळाव्यात हा सन्मान सोहळा पार पडला. पंचायत समितीचे सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस यांच्या हस्ते घोटगेवाडीचे सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, ग्रामपंचायत अधिकारी सुजय थेटे, कर्मचारी नितीन केसरकर आणि रोजगार सेवक नितीन पांगम यांनी हा बहुमान स्वीकारला.
“ग्रामसेवक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, रोजगार सेवक आणि लाभार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करता आले. शासनाच्या योजना पारदर्शक व गतीने राबवून प्रत्येक गरजू कुटुंबाला हक्काचे पक्के घर मिळवून देणे हेच आमच्या ग्रामपंचायतीचे ध्येय आहे.”
— श्रीनिवास शेटकर, सरपंच (घोटगेवाडी)
उपसरपंच सागर कर्पे यांनी यावेळी ग्रामपंचायतीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “घोटगेवाडी गावकुसाला तालुक्यात सर्वाधिक घरकुले मंजूर झाली होती. ती सर्व वेळेत पूर्ण करून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविणे ही गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ‘काम बोलतं’ हेच आमचे ब्रीद असून, ही कामगिरी गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि सांघिक प्रयत्नांचे फलित आहे.”
या सोहळ्याप्रसंगी तालुक्यातील शेतकरी, विविध ग्रामपंचायतींचे अधिकारी, कृषी सहाय्यक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. घोटगेवाडी ग्रामपंचायतीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.













