रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील कचरे येथील आंबा बागेत राखणीचे काम करणाऱ्या उत्तरप्रदेश येथील कामगाराने अज्ञात कारणातून त्याच बागेत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 24 मार्च रोजी दुपारच्या सुमारास निदर्शनास आली.
महेश राधेशाम (33,मुळ रा.श्रीनगर लखमीपूर खेरी उत्तरप्रदेश सध्या रा.सांडेलावगण जयगड) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. महेश हा गेल्या चार महिन्यांपासून समिर रोहिदास रहाटे यांच्या आंबा बागेत मजूरीचे काम करत होता. मागील दोन ते चार दिवसांपासून तो जास्त प्रमाणात दारु पित होता. दरम्यान महेश हा राखणीचे काम करत असलेल्या बागेत फोन उचलत नव्हता. म्हणून खबर देणार समिर रहाटे यांनी बागेत जाउन पाहिले असता त्यांना महेश हा आंब्याच्या झाडाला टॉवेलने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तातडीने याबाबत जयगड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महेशला प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












