कीर्तन, जाखडी नृत्य, दांडिया, भजन आणि दशावतार नाटकाची मेजवानी
खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील भरणे येथील श्री देवी काळकाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापना, शासकीय सलामी, कीर्तन, जाखडी नृत्याचे जंगी सामने, दांडिया, भजन, मंगळागौर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम आणि दशावतार नाटक अशा विविध कार्यक्रमांनी नवरात्रोत्सवाची रंगत वाढणार आहे. या उत्सवासाठी श्री देवी काळकाई मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
रविवार, ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना व शासकीय सलामीने उत्सवाची सुरुवात होणार असून, रात्री गावातील जाखडी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. भागवत महाराज भारती यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री १० वाजल्यानंतर दांडियाचा कार्यक्रम होईल.
मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी शाक्तिवाले आणि तुर्वेवाले यांच्या पारंपरिक जाखडी नृत्याचा जंगी सामना होणार आहे. बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी जाखडी नृत्य आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. येरसे महाराज यांचे कीर्तन होणार असून, रात्री दांडियाचा कार्यक्रम रंगणार आहे.
शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी पुन्हा शाक्तिवाले आणि तुर्वेवाले यांच्या जाखडी नृत्याचा जंगी सामना होणार आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी भजन मंडळाचा कार्यक्रम तसेच मंगळागौर आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी जाखडी नृत्याचा जंगी सामना, तर मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दसरा-दांडियाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून, श्री भैरी जोगेश्वरी केदारनाथ भजनी नमन मंडळ, आयनी भौईवाडी यांचा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी ‘फिर्ले फासे’ या दशावतार नाटकाचे सादरीकरण होणार असून, गण आणि नटखट गोळण यांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमासाठी शाहिर रत्नाकर महाकाळ यांचे योगदान असणार आहे.
उत्सवाच्या कालावधीत दररोज पहाटे ५ वाजता काकड आरती, सायंकाळी ६.३० वाजता महाआरती आणि सायंकाळी ७ ते ७.३० या वेळेत हरिपाठ होणार आहे. त्यामुळे भाविकांना दररोज देवीच्या दर्शनासह धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे.
श्री देवी काळकाई मंदिराच्या विश्वस्त मंडळामध्ये अध्यक्ष श्री. महेश जगदाळे, उपाध्यक्ष श्री. सुरेश भुवड, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र शिर्के, सचिव श्री. प्रशांत बुवड, सहसचिव श्री. संदीप खेराडे, खजिनदार श्री. सतीश पाटणे आणि सहखजिनदार श्री. विजय फागे यांचा समावेश आहे.
तसेच मंडळाचे सदस्य म्हणून श्री. भास्कर शिंदे, श्री. सुरेश धुमाळ, श्री. प्रदीप भुवड, श्री. अंकुश भुवड, श्री. दीपक बेकर, श्री. उदय पाटणे आणि श्री. चिराग घडशी कार्यरत आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धा, कोकणातील पारंपरिक लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा संगम अनुभवता येणार आहे. परिसरातील भाविक, ग्रामस्थ, महिला, तरुण आणि नाट्यरसिकांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून देवीच्या उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री देवी काळकाई मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.












