तिवरे धरणाची पुनर्बांधणी सुरू; तिवरे धरणाचे काम ७० टक्के पूर्ण
तिवरे धरण फुटीला सात वर्षे पूर्ण
‘त्या’ भयानक रात्रीच्या आठवणी आजही ताज्या
चिपळूण(वार्ताहर) : तब्बल २२ जणांचा बळी आणि असंख्य कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या तिवरे धरण दुर्घटनेला सात वर्षे पूर्ण होत आहेत. मंजूर ६२. ७४ कोटींतून धरणाची पुनर्बाधणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात २४ आणि आता ३३ अशी एकूण ५७ घरे धरणग्रस्तांना मिळत आहेत. मात्र प्रारंभी मंजूर असलेल्या ४२ वरून घरांची संख्या आता ५७ वर पोहोचली असून दरवेळी संख्या वाढतच चालली आहे. धरणाची पुनर्बाधणी, पुनर्वसन प्रश्न सुटले असले तरी धरणफुटीच्या चौकशीसाठी नियुक्त एसआयटीच्या अहवालानुसार अजूनही कारवाई झालेली नाही. मात्र तिवरे धरणाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे.
दिनांक २ जुलै २०१९ च्या अमावस्येच्या रात्री धो-धो कोसळणाऱ्या पावसात सह्याद्रीच्या पायथ्याशी बांधले गेलेले तिवरे धरण फुटले. धरणाच्या पाण्याच्या लोंढ्यात भिंतीलगत बसलेल्या भेंदवाडीतील २२ घरे, जनावरांचे गोठे आणि २२ जीव वाहून गेले. धरणफुटीनंतर धरण पुनर्बाधणी, चौकशी अहवाल आणि पुनर्वसन याबाबत ज्या पद्धतीने घोषणा केल्या गेल्या त्या तुलनेत सुरुवातीचा काळ निराशाजनक गेला. धरणफुटीनंतर तब्बल दोन वर्षांनी पहिल्या टप्प्यात सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून २४ कुटुंबाना घरे मिळाली तर उर्वरितांना घरांसाठी फेऱ्या माराव्या लागल्या. धरण पुर्नबाधणीही रखडली. कोरोना महामारी, त्यानंतरचा महापूर यामध्ये चार वर्षांचा काळ निघून गेल्यानंतर २०२४ मध्ये पुर्नबाधणीसाठी ६२.७४ कोटीला मंजुरी मिळाली. मात्र आर्थिक तरतूद आणि अन्य परवानगी यामध्ये पुन्हा वर्षभराचा कालावधी उलटला. आता धरणाची पुर्नबाधणी, पुनर्वसनासह बरेचसे प्रश्न निकालात निघाले आहेत.
पुनर्वसनासाठी एकूण ५७ घरे
तिवरे चरणफुटीनंतर प्रारंभी ४२ कुटुंबांना घरे बांधण्याची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार सुरुवातीला मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्टने पाच कोटीचा निधी पुनर्वसन प्रकल्पासाठी दिल्यानंतर बांधकाम विभागाने अलोरे येथे २४ घरांचा पुनर्वसन प्रकल्प उभारला. त्यानंतर पुन्हा तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिडकोच्या माध्यमातून अलोरे व तिवरे येथे ३३ घरांची बांधकामे सुरु आहेत. यामध्ये एका घरासाठी जीएसटीसह एकूण २८ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. त्यामुळे पाच वर्षानंतर एकूण ५७ कुटुंबांच्या घरांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. मुळातच सुरुवातीला घरांची जी यादी तयार केली गेली त्यामध्ये नंतर हळूहळू वाढ होत आता ती एकूण ५७ घरांपर्यंत पोहचली आहे. ही वाढीव घरे कशी वाढत गेली याची चर्चाही सध्या मोठ्याप्रमाणात सुरू झाली आहे.
धरणाचे काम युद्धपातळीवर
जलसंधारण उपविभागाने प्रारंभी या धरणाच्या दुरुस्तीमध्ये जेवढे धरण फुटले होते तेवढाच भाग बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना नाशिकने या धरणाचे पूर्ण लांबीचे धरण बांधण्याचे डिझाईन तयार केले. त्यामध्ये वाहून गेलेल्या भागासह सद्यस्थितीत शिल्लक असलेला मातीचा भराव पूर्णपणे काढून नव्याने धरण बांधण्याचे ठरवले आमदार शेखर निकम यांनी त्यासाठी मोठा पाठपुरावा करून त्यासाठी एकूण ६२ कोटी ७४ लाखाच्या खर्चाला मंजुरी मिळवली. तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांचे महत्वपूर्ण सहकार्य या धरणासाठी आमदार निकम यांना मिळाले होते. सद्यस्थितीत ७० टक्के काम झालेले आहे. पावसाळ्यामुळे सध्या काम थांबलेले असले तरी या धरणाच्या ठेकेदाराकडून युद्धपातळीवर केले जात असून पुढील पावसाळ्यात पाणीसाठा होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
एसआयटी अहवाल जाहीर करा
दुर्घटना घडल्यानंतर पुनर्वसन, धरण पुनर्बाधणीसह अनेक प्रश्न सुटले असले तरी या धरणफुटीला जबाबदार असलेले आणि एसआयटीने उपका ठेवलेल्यांवर गेल्या सात वर्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. राज्यात आतापर्यंत तीन सरकार स्थापन झाली, मात्र प्रत्येकाने दोषींना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे एसओयटी अहवाल जाहीर करावा.
-अजित चव्हाण, तिवरे धरणग्रस्त














