पाळ्ये येथील शेतकऱ्याचा गुरांचा गोठा कोसळला; लाखो रुपयांचे नुकसान, तातडीने पंचनाम्याची मागणी

दोडामार्ग:सुहास देसाई 

 

तालुक्यातील पाळये येथील शेतकरी गणेश शिरसाठ यांच्या घराशेजारी असलेला गुरांचा गोठा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, ऐन शेती हंगामात गोठा जमीनदोस्त झाल्याने शिरसाठ यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशातच वाऱ्या-पावसाने शिरसाठ यांच्या गुरांच्या गोठ्याचे अतोनात नुकसान केले. तसेच फणसाची मोठी झाडे उन्मळून कोसळून नुकसान झाले आहे व गोठा अचानक कोसळल्याने पाळीव गुरांच्या निवाऱ्याचा आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीचा मुख्य हंगाम सुरू असतानाच हा दुर्दैवी प्रकार घडल्याने संपूर्ण कुटुंबावर कुऱ्हाड कोसळली आहे.

या आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकरी गणेश शिरसाठ यांनी, महसूल विभागाने या घटनेची दखल घेऊन तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करावा आणि प्रशासनाकडून योग्य ती आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.