रांगोळी व रेडीयम आर्टीस्ट नरेश देसाई यांचे निधन

राजापूर (वार्ताहर): काही वर्षांपुर्वी  राजापूर शहरात समर्थनगर येथे वास्तव्यास असले हरहुन्नरी कलाकार नरेश चंद्रकांत देसाई (५५) यांचे गुरूवार २ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
गेले काही महिने मेंदुच्या कर्करोगाने ते आजारी होते. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरूवारी सांयकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थीवावर शुक्रवारी सकाळी रत्नागिरी येथे अंतीम संस्कार करण्यात आले.
नरेश देसाई हे रांगोळीकार व उत्तम रेडीयम आर्टीस्ट होते. त्यांचे वडील चंद्रकांत देसाई हे ग्रामिण रूग्णालय राजापूर येथे नोकरीस असल्याने त्यांचे वास्तव्य राजापूरात होते. त्यांचा जन्म, बालपण आणि शिक्षणही राजापूर येथे झाले. ते आपला रेडीयमचा व्यवसाय करताना राजापूर हायस्कुल समोर खाऊचा स्टॉल चालवायचे. अत्यंत मनमिळावू आणि मितभाषी असा त्यांचा स्वभाव होता.
गेल्या सुमारे  बारा वर्षांपासून ते रत्नागिरीत स्यायिक झाले होते. परंतु ते दरवर्षी गणपती उत्सवात राजापूरात येत असत. समर्थनगर येथील श्री मारूती मंदिर शेजारीचे ते राहत असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सवात त्यांचा सक्रीय सहभाग असे. सार्वजनिक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत रांगोळ्या काढायला ते दरवर्षीच राजापूरला येत. गेल्या आठ महिन्यांपासून ते मेंदुच्या कर्करोगाने आजारी होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. एका सुस्वभावी कलाकाराला गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ, बहिण, भावजय असा परिवार आहे.