दापोलीत नारळाच्या झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू

दापोली: दापोली तालुक्यातील दाभोळ दालमेश्वर पाखाडी येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा नारळाच्या झाडावरून पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमित संजय जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे. २५ जून २०२६ रोजी अमित हे नारळ काढण्यासाठी झाडावर चढले असता, अचानक पाय घसरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला, दोन्ही हातांना आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने दापोली येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, जेथे प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चिपळूण येथील वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार २६ जून २०२६ रोजी त्यांना डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, येथे औषधोपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद २ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:२४ वाजता करण्यात आली असून, आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे . या घटनेमुळे दाभोळ परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.