सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी तालुक्यातील रिक्त झालेल्या पोलिस पाटील पदांचा अतिरिक्त कार्यभार शेजारच्या गावांतील पोलिस पाटलांकडे सोपविण्यात आला आहे. संबंधित गावांचा प्रशासकीय कारभार सुरळीत आणि विनाव्यत्यय चालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.
तालुक्यातील विविध गावांमधील पोलिस पाटील पदे रिक्त झाल्याने नागरिकांची कामे खोळंबू नयेत म्हणून प्रशासनाने ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. यानुसार तालुक्यातील ओवळिये येथील रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देवसू येथील पोलिस पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, तर कुणकेरी येथील रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार आंबेगाव येथील पोलिस पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
यासोबतच मळेवाड येथील रिक्त पोलिस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार कोंडुरे येथील पोलिस पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
संबंधित गावांचा दैनंदिन आणि प्रशासकीय कारभार कोणत्याही अडचणीशिवाय सुरळीत चालावा, याच मुख्य उद्देशाने हा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आल्याचे तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या आदेशामुळे तात्पुरत्या स्वरूपात का होईना, पण ग्रामस्थांची प्रशासकीय कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.













