खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर (माध्यमिक विभाग) ने यंदाच्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. इयत्ता ५ वी व ८ वी मिळून तब्बल ५९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून रत्नागिरी जिल्ह्यातील इयत्ता ८ वी राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीतील पहिल्या १० विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थी ज्ञानदीपचे असल्याने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ५१ विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले. त्यापैकी ओवी वरुण मोदी हिने राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत द्वितीय, प्रांजल राजाराम तावडे हिने चौथा, अयान विनायक गुडेकर याने पाचवा, आराध्या अजित भोसले हिने सहावा, तर मयंक अभिनित दिवटे याने सातवा क्रमांक मिळवला. याशिवाय जिल्हा गुणवत्ता यादीत आणखी आठ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले.
इयत्ता ८ वीच्या परीक्षेत ५१ पैकी ४६ विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले. रत्नागिरी जिल्ह्यातून राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीसाठी निवडल्या जाणाऱ्या पहिल्या १० विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानदीपचे तब्बल ७ विद्यार्थी स्थान पटकावण्यात यशस्वी झाले. त्यामध्ये समर्थ चंद्रकांत पन्नमवाड चौथा, कुणाल युवराज जाधव पाचवा, आर्य महेंद्र मोरे सातवा, संस्कृती विजयकुमार भिसे नववी आणि सार्थक सचिन भुवड दहावा क्रमांक पटकावला. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये सोहम दिलीप मोहिते याने पाचवा, तर संवेग भरत मरजे याने बारावा क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढवला. याशिवाय जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत ३८ विद्यार्थी, तर तालुका ग्रामीण गुणवत्ता यादीत एका विद्यार्थिनीची निवड झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता ५ वीचा शिष्यवृत्ती निकाल २४.७४ टक्के लागला असताना ज्ञानदीपचा निकाल २५.५० टक्के राहिला. इयत्ता ८ वीचा राज्याचा निकाल १९.९४ टक्के असताना ज्ञानदीपने तब्बल ९०.१९ टक्के निकालाची नोंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आजअखेर ज्ञानदीपच्या इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत ४३८, तर इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत ६१७ विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले आहेत. प्रश्नपत्रिकांचा सातत्यपूर्ण सराव, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन तसेच विद्यार्थी व पालकांचे सहकार्य यामुळे हे यश मिळाल्याचे शाळेने सांगितले.
या यशासाठी वर्गशिक्षक दिलीप मोहिते व सचिन बेर्डे यांच्यासह विजय शिंदे, योगेश चिले, प्रज्ञा मोरे, अंजली जाधव, राजेंद्र नाटेकर, विनोद टेंबे, रामचंद्र भिंगारे, महादेव वाघमोडे, शांतिलाल आव्हाड, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे आणि प्रशालेचे प्राचार्य राजकुमार मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त, पदाधिकारी, सल्लागार मंडळ सदस्य तसेच ज्ञानदीप परिवारातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












