खेड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील कमी पटसंख्या असलेल्या अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळा वाचविण्यासाठी डॉ. श्री. अजित भोसले यांनी सोमवार, ६ जुलै २०२६ पासून पंचायत समिती, खेड समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांचे समायोजन होत असून, त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
डॉ. भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोकणातील ग्रामीण भागात रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे अनेक कुटुंबांतील तरुण रोजगारासाठी मुंबई, पुणे व इतर शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत. अशा परिस्थितीत गावात राहणाऱ्या शेतकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुले स्थानिक मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र कमी पटसंख्येचे कारण पुढे करून शिक्षकांचे समायोजन केल्याने या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, तिसंगी संचलित नूतन इंग्लिश स्कूल, तिसंगी या शाळेचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, गेल्या दोन ते तीन वर्षांत पटसंख्या घटल्यामुळे येथील चार शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे. परिणामी पाचवी ते दहावीच्या सहा वर्गांसाठी सध्या केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
शासनाने १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाचा फेरविचार करून संबंधित शाळांना विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी पुरेशी मुदत द्यावी, समायोजित शिक्षक पुन्हा उपलब्ध करून द्यावेत आणि ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळा टिकविण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी डॉ. भोसले यांनी केली आहे.
या मागण्यांसंदर्भात यापूर्वीच उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, पालकमंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, उपसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदने देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांसह ६ जुलैपासून पंचायत समिती, खेड समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असून, शासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही डॉ. श्री. अजित भोसले यांनी दिला आहे.













