कोंडउमरे येथे ९ वर्षीय पुतणीसह काकाचा शास्त्री नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

देवरूख (प्रतिनिधी) :

नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या ९ वर्षीय पुतणीसह तिच्या ५० वर्षीय चुलत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील कोंड उमरे येथे रविवारी दुपारी घडली. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे कोंड उमरे गावासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. रमेश कांबळे (वय अंदाजे ५० वर्षे) आणि स्वरा संतोष कांबळे (वय ९ वर्षे) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चुलता-पुतणीची नावे आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, कोंड उमरे येथील रहिवासी रमेश कांबळे यांच्या घरी रविवारी ‘मिरगाची राखण’ (स्थानिक सण/विधी) असल्याने, त्यांचे भाऊ संतोष कांबळे हे शनिवारीच आपल्या कुटुंबासह मुंबईहून गावी आले होते. रविवारी दुपारी संतोष यांची ९ वर्षांची मुलगी स्वरा हिने नदीवर अंघोळीला जाण्याचा हट्ट धरला. पुतणीचा हट्ट पुरवण्यासाठी तिचे चुलते रमेश कांबळे हे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तिला घेऊन गावातील शास्त्री नदीच्या ‘टवली डोहात’ गेले होते. नदीवर जाऊन बराच वेळ उलटला तरी दोघेही घरी परतले नाहीत. त्यामुळे काळजीपोटी नातेवाईकांनी नदीकाठी जाऊन शोध घेण्यास सुरुवात केली.

यावेळी चिमुरड्या स्वराचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने नदीकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी पाण्यात शोधमोहीम राबवली असता, काही वेळातच रमेश कांबळे यांचाही मृतदेह पाण्यात मिळून आला. एकाच वेळी घरातील दोघांचा मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.