बंधारे, पूल पाण्याखाली, शेतीचे नुकसान, वाहतुकीवर परिणाम
कणकवली : तालुक्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक नाले-ओढे दुथडी भरून वाहू लागले असून अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले. काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले असून अनेक मार्गांवरील वाहतुकीवरही परिणाम झाला.
सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. शिवडाव येथील गडनदी पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. पुलावर पाण्याचा वेग वाढल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालकांनी वाहने थांबवली, तर काहींना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला.
तालुक्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. बंधाऱ्यांवरून पाणी वाहू लागल्याने परिसरातील संपर्क काही काळासाठी तुटला. दरम्यान, पावसामुळे काही ठिकाणी भातशेती व इतर पिकांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसही जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











