रत्नागिरी : वनपरिमंडळ अधिकारी चिपळूण यांना श्री. जितेंद्र धोंडू होळकर, रा. कोंढेमाळ ता.चिपळूण हे पोपट पकडून विक्री करत असलेबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी वन विभागाचे विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक श्री. वैभव बोराटे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती राजेश्री कीर, वनपरिमंडळ अधिकारी श्री. दौलत भोसले, श्री. उमेश आखाडे, श्री. सुरेश उपरे व वनरक्षक श्री. राजाराम शिंदे, श्रीमती अश्विनी जाधव इत्यादी वनविभागाचे अधिकारी / कर्मचारी यांनी श्री. जितेंद्र धोंडू होळकर, यांचे रा. कोंढेमाळ ता. चिपळूण येथील राहते घरी व गुरांच्या गोठ्यामध्ये धाड टाकून आजूबाजूचा परिसरामध्ये पहाणी दरम्यान श्री. जितेंद्र होळकर यांचे घराशेजारील श्री. प्रभाकर जिवा करंजकर यांच्या लाकडाच्या खोपटीत दोन पिंज-यामध्ये पोपट प्रजातीमधील प्लम हेडेड पॅराकीट (Plum Headed Parakeet) मराठी नाव तुईया या प्रजातीची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ पक्षी आढळून आले आहेत. सदर पक्षांबाबत श्री. जितेंद्र होळकर यांचेकडे विचारणा केली असता हस्तगत करण्यात आलेल्या दोन पिंजऱ्यातील एकूण १२ पोपट हे माझेच आहेत. मी गुरे चारण्यासाठी गावाजवळील डोंगरावर गेलो असता लाकडाच्या डोलीतून सुमारे ४-५ महिने व १ वर्षापूर्वी ताब्यात घेतले आहेत. तसेच यापुर्वी मी १० ते १२ जणांना पोपट विकले असल्याचे सांगितल्याने याबाबत सविस्तर तपास वन विभागामार्फत सुरू आहे. सदर प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ सुधारणा २०२२ अन्वये वनपाल चिपळूण यांचेकडील प्रथम गुन्हा रिपोर्ट क्र. ०२/२०२३ अन्वये श्री. जितेंद्र धोंडू होळकर यांचेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
अधिक तपासासाठी श्री. जितेंद्र धोंडू होळकर, रा. कोंढेमाळ ता.चिपळूण यांना ताब्यात घेतले असता त्यांनी माझा दुधविक्रीचा व्यावसाय असून मी गुरे चारण्यासाठी गावाजवळच्या डोंगरामध्ये घेवून जात असतो. त्यावेळी मी पोपटांचे निरिक्षण करून त्यांची घरटी हेरून पिल्ले जन्मल्यानंतर घरी घेवून येत असे व त्यांची विक्री करत असे. सध्या माझ्याकडे असलेल्या पक्षांची जोडी दोन ते तीन हजार रूपयांना विक्री करणार असलेबाबत कबूल केले आहे. प्लम हेडेड पॅराकीट (Plum Headed Parakeet) हे पक्षी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ व सुधारणा २०२२ अन्वये अनुसूची II मध्ये समाविष्ठ आहे. –
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ व सुधारणा २०२२ च्या कायद्यानुसार पोपटांची विक्री करणे किंवा जवळ बाळगणे या करीता तीन वर्षा पर्यंतच्या कारावासाची शिक्षा किंवा १ लक्ष दंडाची अथवा दोन्ही शिक्षेची तरतुद आहे. तरी वन विभागाकडून आवाहन करणेत येते की, कोणीही वन्यप्राण्यांची शिकार, विक्री, त्यांच्या नैसर्गिक अधिवासास इजा पोहचविणे किंवा जवळ बाळगणे हा गुन्हा असल्याने असे आढळून आल्यास संबधीता विरूध्द तात्काळ कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी तसेच वन्यप्राण्यांविषयी असे काही संशयास्पद आढळून आल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधवा किंवा वन विभागास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन श्री. दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी यांनी केले आहे.












